गडचिंचले प्रकरणात कठोर कारवाई करणार- गृहमंत्री देशमुख

गडचिंचले गावात तीन जणांची जमावाने हत्या केली. त्याठिकाणी पाहणी करुन स्थानिकांशी चर्चा केली - गृहमंत्री अनिल देशमुख  

Updated: May 8, 2020, 07:55 AM IST
गडचिंचले प्रकरणात कठोर कारवाई करणार- गृहमंत्री देशमुख title=
संग्रहित छाया

पालघर : गडचिंचले गावात तीन जणांची जमावाने हत्या केली. त्याठिकाणी पाहणी करुन स्थानिकांशी चर्चा केली. या प्रकाराचा तपास सी.आय.डी कडे देण्यात आला आहे. या हत्याकांडामध्ये जे सहभागी असतील त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याच्या निर्देश संबंधितांना दिले असल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी त्या परिसराला भेट दिल्यानंतर दिली.

गृहमंत्री अनिल देशमुख यांनी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी खासदार राजेंद्र गावित, सर्वश्री आमदार सुनील भुसारा, श्रीनिवास वनगा, राजेश पाटील, जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे, जि. प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी महेंद्र वारभुवन, वसई विरार महानगरपलिकेचे आयुक्त गंगाथरण, पोलीस अधीक्षक गौरव सिंह, उपजिल्हाधिकारी डॉ. किरण महाजन आदी उपस्थित होते.

पालघर जिल्ह्यामधल्या गडचिंचले हत्या प्रकरणाला तीन आठवडे होत असताना, राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी गडचिंचले घटनास्थळ आणि कासा पोलीस ठाण्याला अचानक भेट दिली. यावेळी त्यांच्यासोबत घटनेचे साक्षीदार राष्ट्रवादीचे कार्यकर्ते काशिनाथ चौधरी हेही होते. यावेळी गृहमंत्र्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलणे टाळले. मात्र, त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेतली.

या प्रकरणात आतापर्यंत ११६ जणांना अटक झाली असून, यामध्ये ९ अल्पवयीनांचाही समावेश आहे. या प्रकरणी कासा पोलीस ठाण्याचे दोन अधिकारी आणि तीन कर्मचाऱ्यांचं निलंबन झालंय. तर ३५ जणांच्या तडकाफडकी बदल्या करण्यात आल्या आहेत. 

दरम्यान, कोरोनाचे संकट असल्याकारणाने लॉकडाऊन आणि संचारबंदी करण्यात आली होती. यावेळी महाराष्ट्रातून गुजरातच्या दिशेने जाणाऱ्या साधुंची जमावाकडून हत्या करण्यात आली होती. त्यानंतर एकच खळबळ माजली. या प्रकरणी १०० पेक्षा जास्त लोकांना अटक करण्यात आली होती. तसेच विरोधकांकडून या प्रकरणी आणि संपूर्ण देशातून जाब विचारण्यात आला होता.